बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड पालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी नितीन लांडगे यांची निवड

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत अखेर आमदार महेश लांडगे समर्थक नगरसेवक ॲड. नितीन लांडगे यांची निवड निश्चित करण्यात आली. विशेष म्हणजे, सभापतीपदी पदाची निवडणूक निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे भाजपामधील गट-तट, वाद या चर्चेलाही यानिमित्ताने पूर्णविराम मिळाला आहे.

महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक शुक्रवारी, दि, ५ रोजी झाली. यावेळी सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनी नितीन लांडगे यांना मतदान करीत लांडगे यांची बहूमताने सभापतीपदी निवड घोषित करण्यात आली.यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक- पदाधिकारी उपस्थित होते.


पिंपरी- चिंचवडमधील राजकीय पटलावर समर्थक नगरसेवकांना महत्वाच्या पदांवर अचूक संधी देत आमदार महेश लांडगे यांनी गेल्या ४ वर्षांत राजकीय समतोल साधला आहे. आता माजी आमदार आणि शहराचे प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे यांचे पूत्र नगरसेवक ऍड. नितीन लांडगे यांना महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी संधी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील राजकारणात आमदार लांडगे ‘मॅन ऑफ कमिटमेंट’ ठरताना दिसत आहेत.

२०१७ मध्ये पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांच्यासोबत अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी महापालिकेतील पदवाटप करतांना समान न्याय देण्यात येईल, असा शब्द आमदार लांडगे यांनी समर्थक नगरसेवकांना दिला होता. त्यामुळेच समाविष्ट गावातील पहिला महापौर म्हणून नितीन काळजे, त्यांनतर माळी समाजाचे नेतृत्व करणारे राहुल जाधव यांनाही महापौरपदी संधी दिली होती. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नगरसेवक संतोष लोंढे यांना स्थायी समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी देत आमदार लांडगे यांनी ‘मास्टर स्ट्रोक’ लगावला होता. कारण, समाविष्ट गावांसह भोसरीही राजकीय न्याय देण्याची भूमिका लांडगे यांनी ठेवल्याचे पाहायला मिळाले. माजी सत्तारूढ पेक्षेनेते एकनाथ पवार यांच्या नियुक्तीला समर्थन देत लांडगे यांनी स्थानिक आणि बाहेरचा वादालाही तिलांजली दिली होती. त्यांनतर महापालिका स्थायी समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा समिती, शिक्षण समिती, विधी समिती आदी महत्वाच्या समितीवर समर्थक नगरसेवकांना संधी दिल्याने पदवाटपात भोसरीतील राजकीय समतोल पाहायला मिळतो.

महापालिका पदवाटपात जातीय समतोल…
आमदार लांडगे यांनी मराठा समाजाचे नितीन काळजे, माळी समाजाचे राहुल जाधव यांना सुरवातीला सव्वा- सव्वा वर्ष महापौरपद दिले होते. त्यानंतर स्थायी समिती सभापतीपदी ब्राह्मण समाजाचे विलास मडीगेरी, माळी समाजाचे संतोष लोंढे तसेच अनुसूचित जातीच्या सीमा सावळे यांना स्थायी समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली होती. समाविष्ट गावांसह भोसरी गावातील मतदारही निर्णायक आहेत. त्यामुळे माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे पुत्र आणि ऍड. नितीन लांडगे यांना स्थायी समिती सभापतीपदी संधी दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाला पुन्हा प्रतिनिधित्व दिल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांना मानणारा मोठा मतदार भोसरीत आहे. पण, राष्ट्रवादीच्या काळात लांडगे यांच्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र, नितीन लांडगे यांना न्याय देत आमदार महेश लांडगे यांनी राजकीय समयसुचकता दाखवली आहे. पंचक्रोशीत माजी आमदार लांडगे यांना पुन्हा राजकीय पटलावर मानपान मिळाल्याने त्याचा राजकीय फायदा आमदार लांडगे यांना होणार आहे.

पद वाटपात नगरसेवक ज्येष्ठतेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न…
आमदार लांडगे समर्थक नगरसेवक यांच्यापैकी नगरसेवक रवी लांडगे आणि वसंत बोराटे यांना महत्वाच्या पदावर संधी देणे अपेक्षित आहे. नगरसेवक ज्येष्ठतेनुसार पदवाटपात आमदार लांडगे यांनी बाजू लावून धरली. गावकी- भावकी, समाविष्ट गाव, स्थानिक आणि बाहेरचा यासह जातीय सलोखा आणि समान प्रतिनिधित्व देण्याचा आग्रह आमदार लांडगे यांनी कायम ठेवला. आता आगामी काळात नगरसेवक रवी लांडगे व वसंत बोराटे यांना न्याय देत आमदार लांडगे पद वाटपाचे वर्तुळ पूर्ण करतील, असा राजकीय अंदाज आहे.

Share this: