अफवा पसरविल्याप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करा; निवेदन देणा-या कार्यकर्त्यावरच गुन्हा दाखल
पुणे (वास्तव संघर्ष) – कोरोना विषयी अफवा पसरविल्याप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करा , अशी मागणी करणारे निवेदन घेऊन आलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्यावरच पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे . संचारबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असून पोलिसांकडे निवेदन घेऊन जाणे ही बाब संचारबंदीमध्ये येत नसल्याचा ठपका ठेवत बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . हेमंत बाबुराव पाटील ( वय 50 , रा . टिंगरेनगर , विश्रांतवाडी , पुणे ) असे गुन्हा दाखल झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे .
सविस्तर वृत्त असे की, कोरोना विषाणूविषयी संभाजी भिडे यांची मुलाखत काही वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे पत्र घेऊन हेमंत पाटील हे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत बुधवारी सायंकाळी आले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांना उपनिरीक्षक रवींद्र गोडसे व हवालदार डांगे यांनी हेमंत पाटील हे आले असल्याचे सांगितले.
त्यांनी संभाजी भिडे विरोधात महाराष्ट्र कोविड १९ अधिनियम कलम ६ प्रमाणे कायदेशीर कारवाई करुन अटक करण्याबाबत पत्र घेऊन आलेले आहेत असे सांगितले. ही बाब संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेमध्ये लागू होत नसल्याने व शासनाच्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास कळविण्यात आले. त्यानुसार हवालदार नवनाथ डांगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारत अगेस्ट करप्शन या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.