सीरमच्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना 25 लाखांची आर्थिक मदत जाहीर
पुणे (वास्तव संघर्ष) : कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करणाऱ्या हडपसर मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गुरुवारी (दि 21)रोजी दुपारच्या सुमारास आग लागली होती . या आगीत दुर्दैवाने 5 कामगारांना आपला जीव गमवावा लागला. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक , अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस एस . पूनावाला यांनी या आगीत मृत्यू झालेल्या त्या पाच कामगांराच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे .
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या टर्मिनल 2 येथील आर – बीसीजी प्लान्टच्या इमारतीला दुपारी 1 च्या सुमारास भीषण आग लागली . अग्निशमनच्या 12 गाड्या आणि एनडीआरएफच्या जवानांच्या सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली . या आगीत दुर्दैवाने 5 कामगारांना आपला जीव गमवावा लागला असून 3 जणांना सुखरुप वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले .
पुण्यातील ससून मेमोरियल रुग्णालयात त्या कामगाराचा मृतदेह दाखल झाल्यानंतर त्यांची ओळख पटली . हे पाच कामगार विद्युत फिटिंगचे काम करणारे कंत्राटी कामगार होते . मृतांपैकी 2 महाराष्ट्राचे तर 3 परप्रांतीय होते . सीरमच्या दुर्दैवी आगीच्या दुर्घटनेत पाच जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदतीचा हात पुढे करून सिरम संस्थाने संवेदनशीलता दाखवली आहे.